भजी महोत्सव

मस्त पाऊस पडत आहे मग चहा आणि भजी हवीतच !!!

कुरकुरीत कांदा भजी
साहित्य:-

२ मोठे लाल कांदे
तिखट, मीठ - चवीप्रमाणे
बेसन अंदाजे लागेल तितके
तेल तळण्यासाठी लागेल तितके
किंनचीत हळद
लहान चमचा ओवा
मुठभर कोथींबीर.
कृती:-
कांदा अगदी बारीक उभा उभा कापावा. त्याच्या पाकळ्या नीट वेगवेगळ्या करुन त्यावर मीठ, तिखट, ओवा, हळद घालुन नीट मिसळुन १० मिनीटे बाजुला ठेवावे. १० मिनीटानंतर तळण्यासाठी तेल तापायला ठेवावे. तोपर्यंत कांद्याला पाणी सुटलेले असेल. त्यात थलथलीत भिजेल इतपत पीठ घालावे. पाणी अजीबात घालु नये. कोथींबीर घालुन त्यावर १ चमचाभर गरम तेल घालावे. नीट चमच्याने मिसळुन गरम तेलात भजी करुन दोन्ही बाजुने कुरकुरीत तळाव्यात.
टीप : -
१. ह्या भजीला खेकडा भजी असेही म्हणतात.
२. पीठ भिजवताना पाणी अजिबात वापरु नये.
३. शक्यतोवर लाल कांदा वापरावा. निदान पांढरा कांदा वापरु नये.
४. ही भजी कुरकुरीत होण्यासाठी सोडा घालायची गरज नाही. सोड्याने भजी तेलकट होतात.

कोबीची भजी - Kobichi Bhaji.
साहित्य:-
३/४ कप बारीक चिरलेली कोबी
१/४ कप बारीक चिरलेली भोपळी मिरची
४ टेस्पून बेसन
१ टेस्पून कॉर्न स्टार्च किंवा कॉर्न फ्लोअर
२ हिरव्या मिरच्या
३ लसणीच्या पाकळ्या
१ टिस्पून जिरे
१/२ टिस्पून हिंग
१ टिस्पून हळद
१ टिस्पून लाल तिखट
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल
* कृती:-
१) प्रथम चिरलेली कोबी आणि भोपळी मिरची एका वाडग्यात एकत्र करावे. त्याला थोडे मिठ चोळावे ज्यामुळे भाज्यांना थोडे पाणी सुटेल.
२) मिरच्या आणि लसणीच्या पाकळ्या मिक्सरवर वाटून घ्याव्यात. किंवा मिरचीची आणि लसणीची पेस्ट उपलब्ध असेल तर ती वापरावी.
३) मिठ लावलेल्या भाज्यांमध्ये वर दिलेले सर्व साहित्य घालून मिक्स करावे. अगदी थोडे पाणी घालून कांदा भजीला भिजवतो तितपत घट्टसर भिजवावे.
४) तेल गरम करून भिजवलेल्या पिठाची लहान लहान बोंडं तळून घ्यावीत. भजी तळताना मध्यम आचेवर तळावीत नाहीतर भजी आतमध्ये कच्ची राहण्याचा संभव असतो.
@ वांग्याची भजी / वांग्याचे तळलेले काप. @
लागणारा वेळ: ३५ मिनिटे.
लागणारे जिन्नस : -
कमी बिया असलेली मध्यम किंवा मोठी वांगी.
तांदळाचे पिठ २ ते ३ चमचे
चवीपुरते मिठ
हळद पाव चमचा
मसाला १ चमचा
तळण्यासाठी तेल
पाक कृती : -
१) वांगी धुवून त्याच्या गोल थोड्या पातळ चकत्या पाडायच्या.
२) चकत्यांवर मिठ, हळद, मसाला टाकायचे.
३) थोडेसे पाणी शिंपडून जिन्नस चांगले कापांवर एकजीव करायचे.
४) एका डिश मध्ये तांदळाचे सुके पिठ घेऊन त्यात हे काप घोळवायचे.
५) तवा चांगला तापवून, तेल सोडून हे काप मध्यम आचेवर तळायचे.
६) हे लगेच शिजतात त्यामुळे ३-४ मिनीटांनी उलट करून परत थोडे तेल तव्याभोवती सोडायचे व थोडा वेळ शिजून द्यायचे.
झाले तय्यार तळलेल्या वांग्याच्या तुकड्या म्हणजे वांग्याची भजी
तांद्ळ्याच्या पिठाच्या ऐवजी बेसन हि वापरतात.
तेल आधीच जास्त घालू नका कारण तांदळाचे पिठ तेल लगेच शोषून घेते.
भाकरी व चपाती बरोबर एकदम छान लागते वांग्याची भजी,
लहान मुलांना पण आवडतात.
पालकाची भजी.
४ जणांसाठी (साधारण १० ते १२ भजी.)
वेळ:- ३० मिनीटे.
साहित्य:-
  1. २ ते अडीच कप भरडसर चिरलेली पालकाची पाने
  2. १/४ कप कांदा, उभे पातळ काप
  3. ६ ते ७ टेस्पून बेसन
  4. १ टेस्पून तांदूळ पिठ
  5. १/२ टिस्पून आलेलसूण पेस्ट
  6. ५ ते ७ कढीपत्त्याची पाने, बारीक चिरून
  7. १ टिस्पून तिळ (ऐच्छिक)
  8. १ टिस्पून कसूरी मेथी
  9. १/२ टेस्पून लाल तिखट किंवा गरजेनुसार
  10. १/४ टिस्पून हळद
  11. चिमूटभर खायचा सोडा
  12. चवीपुरते मिठ
  13. २ ते ३ टेस्पून पाणी
  14. तेल, भजी तळण्यासाठी


कृती:-
१) मोठ्या वाडग्यात चिरलेला पालक, कांदा आणि मिठ घालून मिक्स करावे. १० मिनीटे तसेच ठेवावे म्हणजे कांद्याला थोडे पाणी सुटेल.
२) नंतर त्यावर प्रथम एकूण बेसनपैकी ४ टेस्पून बेसन आणि तांदूळ पिठ पेरावे. १ टिस्पून तेल कडकडीत गरम करून पिठावर घालावे. २ मिनीटांनी हलकेच चमच्याने मिक्स करावे. अंदाज घेऊन उरलेले बेसनही घालावे.
३) आता उरलेले जिन्नसही घालावेत. (आलेलसूण पेस्ट, कसूरी मेथी, तिळ, लाल तिखट, हळद, सोडा, आणि थोडे मिठ) सर्व निट मिक्स करा. लागल्यास अगदी थोडे पाणी घाला आणि चिकटसर असा गोळा तयार करा. हे मिश्रण पातळ नको, घट्ट पण चिकटसर गोळा बनवा.
४) भजी तळण्यासाठी कढईत तेल तापवा आणि आच मिडीयम-हायवर ठेवा. छोटी छोटी बोंडं, गोल्डन ब्राऊन आणि कुरकूरीत होईस्तोवर तळा. तेल टिपण्यासाठी टिश्यु पेपरवर काढा.
गरमा गरम भजी टोमॅटो केचप, हिरवी चटणी किंवा लसणीच्या तिखटाबरोबर सर्व्ह करावी.
टीप्स:-
१) पालकाबरोबर थोडी मेथी घातल्यास खुप छान चव येते.
२) १ टिस्पून गरम तेल भजीच्या पिठात घातल्याने भजी छान कुरकूरीत होतात.
३) भजी एकदम मोठ्या आचेवर किंवा कमी आचेवर तळू नयेत. मोठ्या आचेवर तळल्याने भजी बाहेरून लगेच ब्राऊन होतात पण आतमध्ये कच्च्याच राहतात. तसेच एकदम कमी आचेवर तळल्या तर तेलकट होतात. म्हणून नेहमी मिडीयम ते मिडीयम हायवर तळावे.
४) खायचा सोडा घातल्याने भजी हलक्या होतात. पण जास्त प्रमाणात सोडा घातल्यास भजी तेल पितात.
५) पाण्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त पडले तर मिश्रण पातळ होईल आणि भजी कुरकूरीत होणार नाहीत.
बटाटा भजी.
साहित्य:–
3 मोठे बटाटे,
1 वाटी डाळीचे पीठ,
तिखट, मीठ,
हिंग, हळद,
2 चमचे तांदळाचे पीठ,
1 वाटी तेल.
कृती:–
बटाटय़ाच्या साली काढून त्याचे आपल्या आवडीप्रमाणे पातळ किंवा थोडे जाडसर काप करावेत. डाळीच्या पिठात तांदळाचे पीठ, तिखट, मीठ, हिंग, हळद, 2 चमचे तेल गरम करून घालावे व भज्यांसाठी योग्य असे भिजवावे. बटाटय़ाचा एकेक काप बुडवून काढून तो तेलात सोडावा व तळून काढावा.

मिरचीची भजी

वाढणी: २ ते ३ जणांसाठी
वेळ: - ३० मिनिटे
साहित्य:-
८ ते १० लांबड्या मिरच्या
३/४ कप बेसन
१ टेस्पून तांदुळाचे पीठ
१/४ टीस्पून हळद
चिमूटभर खायचा सोडा
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल
कृती:-
१) मिरच्या धुवून घ्याव्यात. एका बाजूने चीर देऊन आतील बिया काढाव्यात. (टीप)
२) बेसन, तांदूळ पीठ, हळद, मीठ एकत्र करून घ्यावे. त्यात साधारण पाउण कपापेक्षा थोडे कमी पाणी घालून पीठ भिजवावे. सोडा घालून मिक्स करावे. पिठाची कन्सिस्टन्सी थोडी दाटसर असावी.
३) तळणीसाठी तेल तापत ठेवावे. मिरच्या पिठात बुडवून नीट कोट करून घ्याव्यात. मध्यम आचेवर टाळाव्यात.
गरमागरम सर्व्ह कराव्यात.
टीपा:-
१) तुम्ही कोणत्या प्रकारच्या मिरच्या वापरत आहात त्यावर आतील बिया काढायच्या कि नाही ते ठरवावे. जर मिरच्या खूप तिखट असतील तर बिया काढाव्यात. किंवा काही जणांना भजी कदम झणझणीत असली तर आवडते. तर अशावेळी आवडीनुसार बिया कमी कराव्यात.
२) खूप जाड सालीच्या मिरच्या वापरू नये. त्या तळल्यावर पटकन शिजत नाहीत आणि भजी कचकचीत लागतात. त्यामुळे पातळ सालीच्या आणि मध्यम तिखट अशा मिरच्या घ्याव्यात.
३) मिरचीच्या आतील बिया काढून आत वेगवेगळे सारण भारत येईल. मी बटाट्याची तिखट भाजी (आले-लसूण लावून) आत भरली होती. आणि पिठात बुडवून नेहेमी प्रमाणे तळून काढली.

मुगडाळीची भजी.
लागणारा वेळ: - २० मिनिटे.
लागणारे जिन्नस : -
१ वाटी मुगडाळ
१ मोठा कांदा
१ चमचा आल्-लसुण पेस्ट
१ चमचा मिरची-कोथिंबीर पेस्ट
२ चिमुट हिंग
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा गोडा मसाला (ऑप्शनल)
तेल तळण्यास उपयोगी पडेल एवढा
चवीनुसार मिठ.
पाक कृती : -
मुगाची डाळ ४-५ तास भिजत ठेवा. नंतर धुवुन पाणी निथळवून ती मिक्सचमधुन वाटून घ्या. वाटताना पाणी आजिबात घालू नका.
आता वरील जिन्नसातील तेल सोडून सगळ वाटलेल्या डाळीत एकजीव करा.
कढईत तळण्यासाठी तेल गरम करत ठेवा. चांगले तापले की त्यात चमच्याने छोट्या छोट्या भज्या टाका. दोन्ही बाजूंनी तळून घ्या.
चांगल्या खरपूस झाल्या की सर्व्ह करा. सोबत सॉस, चटणी काहीही चालेल.
टिपा : -
मुगाची डाळ पथ्याची, पचायला हलकी म्हणून आजारी, चणाडाळ न चालणार्‍या लोकांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
ह्याच मिश्रणात पालेभाज्या कापुनही मिक्स करता येतात.
गॅस नेहमी मिडीयम ठेवायचा.
चणाडाळ भजी / वडे.
 लागणारा वेळ: - ३० मिनिटे.
 लागणारे जिन्नस : -
चणा डाळ पाव किलो
२ मिडियम कांदे चिरुन
२ ते ३ मिरच्या चिरुन
मुठभर कोथिंबीर चिरून
१ चमचा धणेपुड (असल्यास)
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
चविनुसार मिठ
तळण्यासाठी तेल.
पाक कृती : -
चणा डाळ ५ ते ६ तास भिजत ठेवा. ५ - ६ तासांनंतर ती स्वच्छ धुवुन मिक्सरमधुन थोडेसेच पाणी घालून जाडसर लगदा होईल अशी थोडी चरट वाटून घ्या.
वाटलेल्या पिठात चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची, हिंग, हळद, धणेपुड, मिठ घालून एकत्र करा.
आता लिंबाएवढा ह्या मिश्रणाचा गोळा घेउन त्याचे चपटे वडे करुन तेलावर मिडीयम गॅसवर शॅलोफ्राय करावेत. ६-७ मिनिटे एक बाजू शिजायला लागते.
हे आहेत तयार डाळवडे.
टिपा : -
घरात लहान मुले असतील तर मिरची सरळ डाळीसोबत वाटून घ्या म्हणजे खाताना मिरची तोंडात येणार नाही.
आल-लसुण पेस्ट तसेच गरम किंवा गोडा मसालाही घालू शकता.
हा वडा चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. वरुन गरम गरम चहा तर मस्तच.
स्पेशल भजी रेसिपीज ----
१)  वेफर्स ची भजी --- LAYS चे वेगवेगळ्या स्वाद चे वेफर्स घ्या आणि बटाटा भजी प्रमाणेच भजी करा -हि भजी बटाटा भजी सारखी थंड झाल्यावर मऊ पडत नाहीत --पीठ थोडे पातळ ठेवा आणि कुरकुरीत तळा
२) बटाटे वड्याचे  पुरण बनवा आणि त्याचे गोळे करताना आत चीझ किंवा पनीर चा क्यूब घाला आणि गोळा नीट करून बेसनाच्या पिठात बुडवून बटाटा वड्याप्रमाणे तळा --छान चवीचे वडे/भजी होतात
३) मश्रुम चे देठ काढून त्या पोकळ जागी मिरची ,लसूण आणि चीझ स्प्रेड ची पेस्ट बनवून भरा आणि मश्रुम ला बाहेरून देखील थोडी पेस्ट फासून मॅरीनेट करा अर्धा तास आणि बेसनाच्या ओल्या भजी पिठात बुडवून  कुरकुरीत भजी तळा
४) भोपळी मिरची  चे एक,दीड इंची चौकोनी तुकडे करून भजी करा --मस्त लागतात
५) कांदा भजी जर राजा भजी तर घोसाळ्याची भजी राणी भजी !!!--घोसाळे साले काढून (तिची चटणी करता येईल सालाची ) घोसाळ्याचे आडवे  अर्धा इंची गोल काप काप आणि त्याला मीठ तिखट लावून ठेवा --आणि १० मिनिटांनी भजी तळा बेसनाच्या भजी पिठात बुडवून --भजी मऊ असतात --राणी सारखी --पण खूप टेस्टी असतात --गरम गरम खावीत
परदेशी घोसाळी नाही मिळत तेथे कोरजेट किंवा झुकुनी नावाची हिरव्या काकडी सारखी भाजी मिळते तिची अगदी घोसाळ्या सारखीच भजी लागतात --करून पहा !

Comments